संत गाडगेबाबा यांचे 35 प्रेरणादायी विचार | Sant Gadge baba quotes in marathi

Sant Gadge baba quotes in marathi : स्वच्छतेच्या माध्यमातून गावची घाण आणि अस्वच्छता साफ करणारे आणि आपल्या प्रभावी कीर्तनाच्या माध्यमातून लोकांच्या मनातील अंधश्रद्धेची घाण साफ करणारे संत गाडगे महाराज शिकलेले नव्हते. परंतु वैज्ञानिक दृष्टिकोन असणारे महान समाज सुधारक होते. ते आपल्या किर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करत होते. त्यांनी समाजाला शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले आणि स्वच्छता तसेच चारित्र्य याची शिकवण दिली. त्यांचे विचार मानवाला विचार करायला लावणारे आहेत. आजच्या या पोस्टमध्ये आपण संत गाडगेबाबा यांचे 35 प्रेरणादायी विचार (Sant Gadge baba quotes in marathi) जाणून घेणार आहोत.

संत गाडगेबाबा यांचे विचार (Sant Gadge baba quotes in marathi)

संत गाडगेबाबा यांचे विचार (Sant Gadge baba quotes in marathi)

1) हवा आहे, लाल आहे, हिरवी आहे, पिवळी आहे, ते समजत नाही आणि त्याचे ठिकाण नाही. असाच परमेश्वर आहे. हे जे तिर्थात देव बसलेले आहेत ना, हे पोट भरण्याचे देव आहेत.

2) गणपती बसवणे देवाची भक्ती नाही. जेव्हा तुम्ही गणपतीला आणता, बँड लावता, भजन लावता आणि वाजवत वाजवत आणता, आणून सिंहासनावर बसवता अन् त्याची पूजा करता. निवद, मोदक, आरत्या आणि शेवटच्या दिवशी उठवता. ज्याची एवढी भक्ती केली, एवढी शोभा केली, ज्याच्या आरत्या केल्या. त्याला पाण्यात बुडवून मारता! तुमच्यावर कधी खटला भरला तर फौजदारी होते. ही देवाची भक्ती नाही. देवाची भक्ती म्हणजे भजन…

3) ज्या साली लढाई झाली त्या साली एक एक आगबोट 50-50 कोटी रुपयांची पार तळाला गेली. अशा किती आगबोटी बुडाल्या. सत्यनारायण करणाऱ्या महाराजाला म्हणावं, अडीच रुपये घेऊन कशाला एवढी बडबड करता? अडीच लाख रुपये घ्या, अडीच कोटी रुपये घ्या. समुद्राच्या किनाऱ्यावर एक सत्यनारायण करा अन् एक आगबोट वर आणा. हे त्यांना जमणार नाही.

4) देव देवळात नाही. देऊळ तयार झालं, मूर्ती आणावी लागते. मूर्ती विकत भेटते. देव विकत भेटतो का? मेथीची भाजी आहे की कादे-बटाटे आहेत? देव विकत भेटतो हेही समजत नाही ज्या माणसाला, तो माणूसचं कसा!

5) तुमच्या देवाचा देवळा पूरता तरी उजेड पडतो का? नाही. मग दिवा विझला, मंडळी दर्शनाला आली, बापूराव दिवा लावा. मग देव कोणी दाखवला? दिव्यानं…! दिवा मोठा की देव मोठा? दिवा…!

6) माणसाचे धन तिजोरी नाही, सोनं नाही, हिरे नाही, मोटर नाही. माणसाचं धन कीर्ती आहे. चार महिने बरसात परमात्मा देते. मग जमीन पिकते. चार महिने बरसात नाही पडली, तर जमीन पिकेल का? हजारो करोडो लोक मरतील, देवाला आपण फुलं वाहतो. फुलं कोणी पैदा केली? आपल्या आजाने की पंजाने? देवाने केली. मग त्याचीच फुलं, त्याचीच बरसात, आपण त्याचं त्यालाच देतो.

7) गरिबांसाठी बायांचे दवाखाने बांधा. गोरगरिबाला औषधी द्या. गोरगरिबाला कपडे द्या. आस्तेर पावशेर चावल द्या. गोरगरिबांवर दया करा. मराठे, माळी, तेली, न्हावी, धोबी, चांभार, कोळी, कुंभार, लोहार, वडारी, बेलदार, कैकाडी, गोंड, गवारी, मांग आणि महार. हे लोक का गरीबीत राहिले? त्यांना विद्या नाही आणि ज्याला विद्या नसेल, त्याला खटाऱ्याचा बैल म्हटलं तरीही चालेल. आता तरी सुधरा. आता तरी मुलांना शिक्षण द्या. पैसे नाही म्हणालात तर जेवणाचं ताट मोडा. हातावर भाकरी खा. बायकोला लुगडं कमी भावाचं, कमी किंमतीचं घ्या. ईव्हायाला पाहुणचार करू नका. पण मुलांना शाळेत घातल्याशिवाय सोडू नका. विद्या मोठं धन आहे. विद्या मोठी गोष्ट आहे. तुम्हाला आम्हाला विद्या नाही तर मजुरी तरी लागली. पण या टायमाला मुलांना विद्या दिली नाही, तर तुमच्या मुलाला मजुरी लागणार नाही, तर बूट पॉलिश करावी लागेल.

8) डॉक्टर आंबेडकर साहेब यांच्या वडिलांना सद्बुद्धी सुचली आणि आंबेडकर साहेबाला शाळेत घातलं. आंबेडकर साहेबांन काही लहान-सहान कमाई नाही केली. हिंदुस्तानची घटना केली, घटना! अन् तेच शाळेत गेले नसते अन् शिकले नसते तर झाडू मारणंच त्यांच्या कर्मात होतं. विद्या मोठं धन आहे.

9) मारवाडी, गुजराती, ब्राह्मण हे लोक रोज तुपातला शिरा का खातात? कारण त्यांच्या घरी जमा खर्च आहे. उत्पन्न किती अन् खर्च किती, हे त्यांना माहीत आहे. आमच्या मराठ्याला, तेल्या, माळ्यां, न्हाव्या, धोब्याला जमाखर्च समजतच नाही. जानेवारीत मजा करा आणि फेब्रुवारीत बोंबलत बसा. काटकसर पाहिजे. घरी जमाखर्च पाहिजे.

10) मंडळी जेजुरीला जातात, बकरा नेतात, मानेचा तुकडा कापतात. मसाला लावून, शिजवून खातात. तुमच्या पिढ्याच्या पिढ्या मरतील. तुमचं कधीच बरं होणार नाही. तुम्ही बकऱ्याला चारा टाकता की नाही? हारपला बकरा, पाहून आणता की नाही? बकऱ्याला पाणी पाजता की नाही? पाऊस आला,बकऱ्याला घरात बांधता की नाही? पोटच्या पोरासारखं वागवता बापा अन् त्याले मसाला लावून, कापून खाता! माणसं नाही तुम्ही. त्यांना रानडुकरं जरी म्हटलं तरीही चालेल. ज्यांच्या हातानं दुसऱ्यांच्या मानेवर सुरी जात असेल, दुसऱ्याची मान कापून आपलं पोट भरत असेल, या लोकांच्या अंगात माणसाचा अंश नाही.

11) विद्या शिका आणि गरिबाला विद्यासाठी मदत करा. गरीबाच्या मुलाला कपडे द्या. टोपी द्या. पाटी द्या. कोरी वही द्या. आपल्या पोराला विलायतेला पाठवायची इच्छा करता अन् गरिबांच्या मुलाला एक-दोन आण्याची वही देण्याची आपल्यात बुद्धी नाही तर आपण माणसं नाही.

12) दिवाळीला टोपलं भर लाडू केले. घरच्या पोराला खूप खाऊ घाला. पण दोन पोरं गरिबाचे येऊन उभे राहिले, तर त्यांना दोन लहान, दोघाला दोन लाडू द्या.

13) बायांनो, नवरा तीर्थाला जाईल, जाऊ द्या. नवऱ्याचा देव डोंगरात असेल. पण तुमचा देव घरात आहे. आपल्या नवऱ्याची सेवा करा. दररोज नवऱ्याच्या पाया पडा. नवऱ्याच्या गळ्यात फुलांचा हार घाला. नवऱ्यापुढं अगरबत्ती लावा.

14) ज्या घरात देवाचं भजन असेल, त्या घराच्या दरवाज्यावर परमेश्वर राखण आहे. ज्या घरात निंदा असतील, फुकट गप्पा असतील, कमी-जास्त गोष्टी असतील, त्या घराच्या दरवाजावर यमराज आहे.

15) मोठ्या मोठ्या घरी भांडे घासणारी बाई आहे. चारी बाजूनं लुगडं फाटलेलं. दोन लेकरं जमिनीवर टाकते आणि मोठ्या भांड्याच्या ढिग उचलते. तिची दया येऊ द्या. तिला दिवस असतील आणि ती दरिद्री असेल, तर ती बाळंतपण कसं करेल? आपण तिला मदत करा. गहू नका देऊ, ज्वारीचं पीठ द्या. तूप नका देऊ, तेल द्या. नवं लूगडं नका देऊ, जूनच लूगडं द्या.

संत गाडगेबाबा सुविचार मराठी (Sant Gadge baba suvichar in marathi)

16) काही करुन मरा. फक्त खाऊन मराल तर फुकट जन्म आहे.

17) कोणी तुम्हाला जात विचारली, तु कोण? तर म्हणावं मी माणूस. माणसाला जाती दोनच आहेत. बाई आणि पुरुष. या दोनच जाती आहेत. तिसरी जातच नाही.

18) सरकारने दारूबद्दल उपदेशच करायला नको. पण मुलंच पोलीस झाले पाहिजे. बाप दारू पिऊन सापडला, असा बडवा की बापाच्या बापाने पाहिलं नसेल, असा थंडा करा.

संत गाडगेबाबा यांचे विचार (Sant Gadge baba quotes in marathi)

19) देवासाठी पैसा खर्च करू नका. तोच पैसा शिक्षणाला द्या. मंदिराची भर करू नका. जो विद्यार्थी हुशार आहे, तो पैसा त्याला द्या. धर्मकृत्य करण्यासाठी नाही, विद्या घेण्यासाठी पैसा खर्च करा.

20) शाळेहून थोर मंदिर नाही. उदार देणगी शाळेला द्या. भक्तीचा प्रसार नाही श्रेयस्कर, शिक्षण प्रसार सर्वश्रेष्ठ.

21) माय बाबांनो, घरीदारी व गावात नेहमी स्वच्छता ठेवा. मुला-मुलींना शिकवा. अंध, अपंग, अनाथांना यथाशक्ती अन्न, वस्त्र दान करा.

22) गाय सुखी, तर शेतकरी सुखी आणि शेतकरी सुखी, तर जग सुखी. म्हणूनच गोपालन, पशुपालन प्रेमाने करा आणि सर्व प्राणिमात्रांवर दया करा. हाच आजचा धर्म आहे.

23) माणसाचे खरोखर देव कोणी असतील तर ते आहेत “आईबाप.” आई बापाची सेवा करा.

संत गाडगेबाबा सुविचार मराठी (Sant Gadge baba suvichar in marathi)

24) दान घेण्यासाठी हात पसरू नका. दान देण्यासाठी हात पसरा.

25) दुःखाचे डोंगर चढल्या शिवाय सुखाचे किरण दिसत नाहीत.

26) जो वेळेवर विजय मिळवतो, तो जगावरही जय मिळतो.

27) दगडधोंड्यांची पूजा करण्यात वेळ आणि शक्ती वाया घालवू नका.

28) तिर्थात देव नाही, पैशाचा नास आहे. जे तीर्थाला जातात, त्यांना पैशाचा नास करण्यातच तिर्थ आहे.

29) देवळात देव नाही. देव कुठे आहे? या जगात देव आहे. जगाची सेवा करा. गरिबांवर दया करा.

30) आमचे भोळवट लोक, एखाद्याने गावात घर बांधलं, तर दोघं-तिघ म्हणतात,”लेका त्याले देवानं दिल.” तुम्ही उन्हा पावसात मेले, तरी देव घर देत नाही. मरा खुशाल. घर बांधील माणूस आणि घर गमावेल माणूसच.

31) अनेक जण म्हणतात, “पगार पुरत नाही.” पगार सरतचं नाही, असे म्हटले पाहिजे. ज्या घरात नवरा-बायको बुद्धिमान, अक्कलवान असतील, तिथे पगार सरत नाही. शिल्लक पेटीत टाकली पाहिजे.

32) कुत्री आपल्या पिल्लाला पाजते. चिमणी आपल्या पोराले चारा नेते. मुक्या जनावरांनं केलं ना, मग माणसांनं माणसाच्या जन्मात येऊन काय करावं? परोपकार कराल, तरच हा माणूस जन्म आहे. काही तरी करा.

33) ज्या दारून करोडपतीचा खाना खराबा केला, राजपुत्र मारले, राजवाडे ओसाड पडले, त्या दारूच्या सावलीत उभं राहू नका. जे दारू पितील, त्यांचा खाना खराबा झाल्याशिवाय राहणार नाही.

34) सुरुवात कशी झाली, यावर बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो.

35) एका घरात दहा माणसे आहेत व घरात पैशाची तिजोरी आहे. त्या तिजोरीची किल्ली दहा माणसाजवळ राहत नाही, तर ती एकाच माणसाजवळ राहते. तसेच ब्रह्मांड हे एक मोठे घर आहे. त्याची किल्ली मालकाच्या हाती आहे. तोच आशीर्वाद देऊ शकतो. देवाशिवाय दुसरा कोणी आशीर्वाद देईल, तर ती लबाडी आहे.

हे होते संत गाडगेबाबा यांचे विचार (Sant Gadge baba quotes in marathi).

संत गाडगेबाबांचा संदेश

भुकेलेल्यांना = अन्न
तहानलेल्यांना = पाणी
उघड्यानागड्यांना = वस्त्र
गरीब मुलामुलींना = शिक्षणासाठी मदत
बेघरांना = आसरा
अंध, पंगू रोगी यांना = औषधोपचार
बेकारांना = रोजगार
पशु-पक्षी, मुक्या प्राण्यांना = अभय
गरीब तरुण-तरुणींचे = लग्न
दुःखी व निराशांना = हिंमत
गोरगरिबांना = शिक्षण

गाडगे महाराज कविता

कीती पुजला देव तरी,
देव अजुन पावला नाही…
कुठं राहतो कुणांस ठाऊक,
अजुनपर्यंत घावला नाही..||धृ ||


मंदिरासमोर लुटली इज्जत,
हा बघत बसला पोरीला,
रक्षण करतो म्हणाला, अन् स्वत:च गेला चोरीला,
हातात असुन धारदार शस्र,
कधी चोरामागे धावला नाही..
कुठं राहतो कुणांस ठाऊक अजुनपर्यंत घावला नाही…||1 ||

सगळं काही तोच देतो,
तोच पुरवतो सगळ्यांची हौस…
शेतक़री बघतो आभाळांकडं,
मग गेला कुठं पाऊस…
खुप केलं हरी हरी तरी,
मुखांत कधी मावला नाही…
कुठं राहतो कुणांस ठाऊक,
अजुनपर्यंत घावला नाही…||2||

कधी स्वत: राहून उपाशी, भुक त्याची भागवली…
हा म्हणे नैवद्यावर थोडी,
साखर का नाही मागवली…
आहार त्याचा वाढतं गेला,
कधी एका बक-यावर भागला नाही…
कुठं राहतो कुणांस ठाऊक,
अजुनपर्यंत घावला नाही…||3 ||

आंघोळ करतो दुधाने,
जणू सगळ्याच गाई त्याच्या बापाच्या…
तोच घागरी भरतो म्हणे,
पुण्य अन् पापाच्या…
पाप-पुण्याचा हीशोब कधी,
त्यानं दावला नाही…
कुठं राहतो कुणांस ठाऊक,
अजुनपर्यंत मला घावला नाही…||4 ||

संत गाडगेबाबा यांचे विचार वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

संत गाडगेबाबा यांच्या जीवनावर कादंबरी कोणी लिहिली

प्रबोधनकार ठाकरे (मानवतावादी युगपुरुष संत गाडगेबाबा)

डेबु कादंबरी कोणी लिहिली? (debu hi kadambari koni lihili)

विठल वाघ

गाडगे महाराजांचा विवाह कधी झाला?

1892 (कुंताबाई)

गाडगे महाराजांचे घरचे नाव काय होते?

डेबूजी झिंगराजी जानोरकर

संत गाडगेबाबा कादंबरी

मानवतावादी युगपुरुष संत गाडगेबाबा (प्रबोधनकार ठाकरे)

डेबुला कशाची हाऊस होती

कोणतेही काम मनापासून करण्याची ची

गाडगे महाराज भजन

गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला” हे गाडगे महाराजांचे आवडते भजन होते.

संत गाडगे महाराजांनी जनतेला कोणता उपदेश दिला ?

चोरी करू नका, सावकाराकडून कर्ज काढू नका, व्यसनांच्या आहारी जाऊ नका, देवा-धर्माच्या नावाखाली प्राण्यांची हत्या करू नका, जातिभेद व अस्पृश्यता पाळू नका.

सारांश (Summary)

आजच्या या पोस्टमध्ये आपण संत गाडगेबाबा यांचे विचार (Sant Gadge baba quotes in marathi) जाणून घेतले. संत गाडगेबाबा सुविचार मराठी (Sant Gadge baba suvichar in marathi) तुम्हाला कसे वाटले हे कमेंट मध्ये नक्की सांगा. स्वच्छतेचे प्रसारक संत गाडगेबाबा यांच्या विषयी जर तुमच्याकडे काही माहिती असेल तर ती आमच्यापर्यंत नक्की शेअर करा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा.

One thought on “संत गाडगेबाबा यांचे 35 प्रेरणादायी विचार | Sant Gadge baba quotes in marathi

  1. समाजातील अंधश्रद्धा व अनिष्ट प्रथा दूर करण्यासाठी राष्ट्रसंत गाडगेबाबा यांनी आपले जीवन समर्पित केले.झाडूने परिसर स्वच्छ करता करता समाजातील वाईट विघातक प्रथा परंपरा आपल्या कीर्तनातून त्यांनी सोप्याभाषेत प्रबोध करून समाजसुधारणेचे मोठे कार्य केले.अशिक्षित असून त्यांनी शिक्षणाचे महत्त्व जाणले.देव दगडात नसून माणसातच असल्याचे ठासून सांगितले. चोरी करू नका,पोरा बाळांना शिक्षण द्या,गरिबाला मदत करा,व्यसनी बनू नका,खरे बोला,भुकेल्याना अन्न व उघड्या नागड्याना वस्त्र द्या.असा साधा सोपा उपदेश करून समाजाला स्वच्छतेचा मंत्र दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *