शांता शेळके यांच्या कविता | Shanta Shelke Poems in Marathi

Shanta Shelke Poems in Marathi : शांता शेळके या एक प्रतिभासंपन्न मराठी कवयित्री होत्या. याशिवाय त्या एक प्राध्यापिका, संगीतकार, लेखिका, अनुवादक, बाल साहित्य लेखिका, साहित्यिक, आणि पत्रकार होत्या. शांता शेळके या केंद्रीय फिल्म प्रमाण मंडळाच्या, तसेच राज्य नाटक परिनिरीक्षण मंडळाच्या सदस्य होत्या. आजच्या या पोस्टमध्ये आपण शांता शेळके यांच्या कविता (Shanta Shelke Poems in Marathi) जाणून घेणार आहोत.

शांता शेळके यांच्या कविता (Shanta Shelke Poems in Marathi)

शांता शेळके माहिती मराठी (Shanta Shelke information in marathi)

नाव शांता शेळके
वडील जनार्दन शेळके
जन्म 12 ऑक्टोबर 1922
मृत्यू6 जून 2002
राष्ट्रीयत्वभारतीय
भाषामराठी
शांता शेळके माहिती मराठी (Shanta Shelke information in marathi)

शांता शेळके यांचा जन्म 12 ऑक्टोबर 1922 साली पुणे जिल्ह्यातील इंदापूर गावी झाला, व शिक्षण पुण्यात झाले. आचार्य अत्र्यांच्या “नवयुग’ मध्ये 5 वर्षे उपसंपादक राहिल्यानंतर त्यांनी नागपुरातील हिस्लॉप महाविद्यालय, तसेच मुंबईतील रुईया व महर्षी दयानंद महाविद्यालयांमध्ये मराठीच्या अध्यापिका म्हणून काम केले. आळंदी येथे 1996 साली भरलेल्या अखिल भारतीय मराठी संमेलनाच्या त्या अध्यक्षा होत्या.

शांता शेळके यांना मिळालेले पुरस्कार

  • गदिमा गीतलेखन पुरस्कार 1996
  • सुरसिंगार पुरस्कार
  • केंद्र सरकारचा उत्कृष्ट चित्रगीत पुरस्कार
  • यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान पुरस्कार

शांता शेळके यांच्या कविता (Shanta Shelke Poems in Marathi)

साद पावसाची आली कविता

साद पावसाची आली, शहारली माती
भुई सवे आभाळाची, जुळे आज प्रीती

उठावले घन घन घोर, नील कंठ झाले मोर
पिसार्यात लाखो डोळे, गगन न्याहाळीती

निळामधे हीरक जडती, तसे शुभ्र बगळे उडती
कोसळती धारा धारा, दिशा धुंद होती

चिंब चिंब जांभुळ रानी, मेघ मंद्र घुमती गाणी
मुके भाव हृदया मधले, शब्द रूप होती

तृप्त शांत झाली धरणी, मधुस्म्रिते हिरव्या कुरणी
पुसट चुंबना सम ओल्या सरी येती जाती

गगन धरा झाली एक, मुक्त प्रीतिचा अभिषेक
एक निळ्या आनंदाची धुंद ये प्रतीती

पैठणी कविता

फडताळात एक गाठोडे आहे
त्याच्या तळाशी अगदी खाली
जिथे आहेत जुने कपडे
कुंच्या टोपडी शेले शाली
त्यातच आहे घडी करुन
जपून ठेवलेली एक पैठणी
नारळी पदर जरी चौकडी
रंग तिचा सुंदर धानी

माझी आजी लग्नामध्ये
हीच पैठणी नेसली होती
पडली होती सा-यांच्या पाया
हाच पदर धरून हाती
पैठणीच्या अवतीभवती
दरवळणारा सुष्म वास
ओळखीची.. अनोळखीची..
जाणीव गुढ़ आहे त्यास

धूर कापूर उदबत्यांतून
जळत गेले किती श्रावण
पैठणीने जपले
एक तन.. एक मन..
माखली बोटे
पैठणीला केव्हा पुसली
शेवंतीची चमेलीची
आरास पदराआडून हसली

वर्षामागुन वर्षे गेली
संसाराचा सराव झाला
नवा कोरा कडक पोत
एक मऊपणा ल्याला
पैठणीच्या घडीघडीतून
अवघे आयुष्य उलगडत गेले
अहेवपणी मरण आले
आजीचे माझ्या सोने झाले

कधीतरी ही पैठणी
मी धरते ऊरी कवळुन
मऊ रेशमी स्पर्शामध्ये
आजी भेटते मला जवळुन
मधली वर्षे गळुन पडतात
कालपटाचा जुळतो धागा
पैठणीच्या चौकड्यानो
आजीला माझ्या कुशल सांगा

हे एक झाड आहे

हे एक झाड आहे याचे माझे नाते
वाऱ्याची एकच झुळूक दोघांवरून जाते

मला आवडतो याच्या फुलांचा वास
वासामधून उमटणारे जाणिवओले भास

पहिल्यानेच याची मोहरताना फांदी
ठेवली होती बालगणी याच्या कटीखांदि

मातीचे झाड: झाडाची मी: माझी पुन्हा माती
याच्या पानांवरच्या रेषा माझ्या तळहाती

ढलपी ढलपी सुटून मुळे झाली सैल
रुजते आहे झाड माझ्या रक्ताच्याही पैल

कधीतरी एके दिवशी मीच झाड होईन
पानांमधून ओळखीचे जुने गाणे गाईन

ओलेत्या पानात कविता

ओलेत्या पानात, सोनिया उन्हात भरुन मेघ आले
डहाळी जणू नवी नवरी हळद रंग ओले
साद ओली पाखराची ओढ जागे पावसाची
डोहाळे या मातीला, सूर बोले थेंबातला
वाटा आता कस्तुरी, गंध उमले कोंबातला
थरारे मन, वारे नविन, सृजन रंग न्हाले
स्वप्न लहरे नवे कांचनी, धून हरवे रानातूनी
राधिका झाली बावरी, जन्म लहरे मुरलीवरी
तृप्ती निराळी, उजळीत डोळी, स्वर हे कुठून आले
हरपून दाही दिशा, ओढाळ झाल्या कशा
शिणगार करती ऋतू, प्रीत स्पर्शात जाई उतू
अभिसार न्यारा, हळवा शहारा, अरुपास रुप आले..

शूर आम्ही सरदार कविता

शूर आम्ही सरदार अम्हाला काय कुणाची भीती?
देव, देश अन् धर्मापायी प्राण घेतलं हाती!
आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत
तलवारीशी लगिन लागलं जडली येडी प्रीत
लाख संकटं झेलुन घेइल अशी पहाडी छाती !
जिंकावे वा कटुन मरावं हेच अम्हाला ठावं
लढुन मरावं, मरुन जगावं हेच अम्हाला ठावं
देशापायी सारी इसरू माया ममता नाती!’

शब्द कविता

तसे तर शब्द जिवाभावाचे सखेसोबती
श्वासोच्छ्वासाइतके मला निकटचे क्षणोक्षणी
शब्दांच्या आधारानेच सोसत आले आजवर
प्रत्येक आनंद, आघात, आयुष्यातली अधिक उणी
अजूनही जेव्हा मन भरुन येते अनिवार
करावे वाटते स्वतःला शब्दांपाशी मोकळे
वाटते, त्यांनाच जावे सर्वस्वाने शरण
तेच जाणून घेतील आतले उत्कट उमाळे
तरीही शब्द हाताळताना असते सदैव साशंक
त्यांच्या सुक्ष्म नसा, भोवती धगधगणारा जाळ,
काळीज चिरीत जाणा-या त्यांच्या धारदार कडा
ज्या अवचित करतात विद्ध, रक्तबंबाळ
मी तर कधीचीच शब्दांची. ते कधी होतील माझे? त्यांच्याशिवाय कुठे उतरू हृदयावरचे अदृश्य ओझे?

चांदणी कविता

सायंकाळी क्षितिजावरती
मंदपणे मी करते लुकलुक
शांत राहुनी अपुल्या जागी
भवतालाचे बघते कौतुक!
अफाट वरती गगन पसरले
विशाल खाली पसरे धरती
मी सृष्टीची सुता लाडकी
चमकते क्षितिजावरती

ऋतु हिरवा कविता

ऋतु हिरवा ऋतु बरवा, पाचूचा वनि रुजवा
युग विरही हृदयांवर सरसरतो मधु शिरवा
भिजुनी उन्हे चमचमती, क्षण दिपती क्षण लपती
नितळ निळ्या अवकाशी मधुगंधी तरल हवा
मनभावन हा श्रावण, प्रियसाजण हा श्रावण
भिजवी तन, भिजवी मन हा श्रावण
थरथरत्या अधरांवर प्रणयी संकेत नवा
नभी उमटे इंद्रधनू, मदनाचे चाप जणू
गगनाशी धरणीचा जुळवितसे सहज दुवा…

आता आपण शांता शेळके यांच्या कविता (Shanta Shelke Poems in Marathi) जाणून घेतल्या.

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

महाकवी कालिदासाची कोणती कलाकृती कवियत्री शांता शेळके यांनी मराठीत अनुवादीत केली आहे?

महाकवी कालिदासाची मेघदूता कलाकृती कवियत्री शांता शेळके यांनी मराठीत अनुवादीत केली आहे.

वर्षा हा काव्यसंग्रह कोणी लिहिला?

वर्षा हा काव्यसंग्रह शांता शेळके यांनी लिहिला.

शांता शेळके यांचे वडील कोणती नोकरी करीत होते?

शांता शेळके यांचे वडील रेंज फॉरेस्ट ऑफिसर होते.

पावसाआधीचा पाऊस या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

पावसाआधीचा पाऊस या पुस्तकाचे लेखक शांता शेळके आहेत.

सारांश (Summary)

मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण शांता शेळके माहिती मराठी (Shanta Shelke information in marathi) जाणून घेतली. शांता शेळके यांच्या कविता (Shanta Shelke Poems in Marathi) तुम्हाला कशा वाटल्या हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला या कविता आवडल्या असतील तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा. जर तुमच्याकडे शांता शेळके यांची गाणी असतील तर ती कमेंट मध्ये नक्की सांगा.

One thought on “शांता शेळके यांच्या कविता | Shanta Shelke Poems in Marathi

  1. शांता बाईंच्या कविता वाचून मन शांत झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *